पुणे - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने शेती उद्योगही अडचणीत येण्याची शक्यता आहे. शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठा, आठवडी बाजार बंद केल्यानंतर आता बाजार समितीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चाकण खेड या प्रमुख बाजार समितीमध्ये बंदमुळे सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
चाकण औद्योगिक नगरीमध्ये असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीत देशभरातून अनेक व्यापारी शेतमाल खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात माल हा चाकण खेड या बाजार समितीमध्ये विक्री केला जातो. त्यामुळे या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी आजपासून बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरातील शेतमाल हा चाकण बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री कशी व कोठे करायची याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा संकटात सापडलेला शेतकरी आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे. शेतकरी मोठ्या मेहनतीने, मोठ्या भांडवली खर्चातून शेती करत असतो मात्र, या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे नेहमीच हा शेतकरी अडचणीत येत असतो. मात्र, आता शेतकऱ्यांपुढे वेगळेच संकट उभे राहिले आहे. शेतात पिकलेला माल हा बाजार समित्या बंद असल्यामुळे विक्री कुठे करायचा? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतमाल विक्रीसाठी वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.