पुणे - कुख्यात गुंड छोटा राजनची पुतणी आणि तिच्या दोन साथीदारांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. धीरज साबळे (रा. धानोरे, ता. खेड), प्रियदर्शनी निकाळजे (रा. वानवडी), मंदार वाईकर (रा.बिबवेवाडी) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी साबळे याला पोलिसांनी खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका बांधकाम व्यावसायिकाने यासंबंधी तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये आरोपी निकाळजे हिने 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या तक्रारीत निकाळजे हिने 25 लाख रुपये स्वतःकडे तर 25 लाख रुपये संबंधित व्यावसायिकाची पत्नी, मेहुणी आणि मंदार यांना देणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय निकाळजे हिने त्याला पत्नीला घटस्फोट देण्यासही सांगितले. खंडणी दिली नाही तर पिस्तूलाच्या 10 गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकीही दिली. मी छोटा राजनची पुतणी आहे. आमचे डीएनए एक आहेत. जीव प्यारा असेल तर सांगितलेले ऐक असे लेखी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - बारामतीत वाळू तस्करांची दोन तलाठ्यांना मारहाण...
संबंधित व्यवसायिकाने पोलिसात धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी 25 लाख रुपयांची रक्कम स्वीकारण्यासाठी धीरज साबळे आला. तेव्हा त्याला पंचांसमोर पैशांची बॅग घेताना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 384, 385, 386, 387 आणि 34व्या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.