पुणे - पैशांचा पाऊस पाडल्याचे भासवून विधवा महिलांची नग्न पूजा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव भीमा आणि पेरणेमध्ये उघडकीस आला आहे. जादुटोणा, भानामती, मांडूळ तस्करीसारखे प्रकारही येथे होत असल्याचे समोर आले आहे. ही अंधश्रद्धा असून महिलांवरील वासनेपोटी असे होत असल्याची प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी दिली.
हेही वाचा - एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याची आमच्याकडे माहिती - गृहमंत्री
याप्रकरणी पीडितेने राहुल वाळके विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जानेवारीमध्ये वाळके विरोधात बलात्कार आणि जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक न केल्याने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. त्याचाच फायदा घेऊन आरोपीने पुन्हा पीडित महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर छापले गांधींच्या हत्येचे छायाचित्र
पैशांचा पाऊस पाडण्याचे तो पीडितेला वारंवार आमिष देत होता. हा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष नंदिनी जाधव यांनी हाणून पाडला. जादुटोणा, पैशांचा पाऊस या सर्व गोष्टी अंधश्रद्धा आणि हात चलाखी असून यावर कुणीही विश्वास ठेवू नका, असे आवाहन जाधव यांनी केले. याप्रकरणी आरोपीवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा आणि पेरणे परिसरात आरोपीची १५ ते २० जणांची टोळी सक्रीय असल्याचे समोर आले आहे.