पुणे - सतत आजारी असणाऱ्या व्यक्तीला तुमच्यावर घटस्फोटीत पत्नीनेच काळी जादू केली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी कबुतरे आणावे लागतील, असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन भोंदूबाबावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी काेंढवा पाेलीस ठाण्यात कुतुबुद्दीन नजमी (रा. काेंढवा, पुणे) व हकिमउद्दीन मालेगाववाला ( रा.काेंढवा खुर्द, पुणे) या आराेपींवर जादूटाेणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अबिझर जुझर फतेपुरवाला (वय- 36 वर्षे, रा.काेंढवा बुद्रूक, पुणे) यांनी पाेलीसांकडे तक्रार केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे 2010 मध्ये गुजरातमधील मुलीसाेबत लग्न झाले हाेते. पण, 2017 मध्ये त्यांचा संमतीने घटस्फाेट घेतला हाेता. चार महिन्यांपूर्वी हुझेफा हा तापाच्या कारणामुळे आजारी पडला हाेता. त्याला काेराेना झाले असेल या शंकेने कुटुंबाने त्याची चाचणी करुन घेतली. पण, त्याचा रिपाेर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अनेकदा उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी धर्मगुरु सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठिक हाेण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंतीसाठी गेले हाेते. त्यावेळी त्यांना तिथे हकिमउद्दीन मालेगाववाला भेटला. त्यास हुझेफाच्या आजारपणाबाबत सांगितले असता त्याने मी तुमच्या घरी येऊन मुलास पाहताे, असे सांगितले.
त्याप्रमाणे हकिमउद्दीन एका माणसाला घेऊन हुझेफा याचे घरी गेला. त्यावेळी त्याने मांत्रिक उपचार करुन हुझेफाच्या पत्नीचा फाेटाे पाहण्यास मागून ताे पाहत त्याने दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना भेटण्यास बाेलावले. हुझेफाचे पत्नीने त्याच्यावर काळी जादू केल्याचे सांगितले व त्यामुळे त्यास त्रास हाेत असल्याचे म्हणाला. ताे मरणाचे दारात असून त्याचा कधी मृत्यू हाेऊ शकताे, असे सांगून घरातील आणखी दाेन लाेकांना काळ्या जादुचा त्रास हाेऊ शकताे, असे सांगितले. त्यावर उपचार करण्यासाठी त्याने मुंबईत सैफी, महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील. ती कबुतरे काळी जादू त्यांच्या अंगावर घेतात. त्यामुळे आपल्याला त्रास हाेत नाही, असे सांगत चार कबुतरे खरेदी करण्यास 6 लाख 80 हजार रुपये मागितले. त्यामुळे हुझेफाच्या वडिलांनी बॅंक खात्यातून त्यांना पैसे काढून दिले.