पुणे - लग्नाचा दिवस कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी नवरी व नवरदेव हटके पद्धतीने विवाह साजरा करतात. यासाठी ते वेगवेगळे फंडे देखील वापरतात. बुलेट चालवत लग्नमंडपात आलेली नवरी, नृत्य करत लग्नमंडपात आलेली नवरी, असे वेगवेगळे प्रकार यापूर्वी घडले आहेत आणि त्याची चर्चा देखील झाली आहे. पण, पुण्यातील एका नवरीने असा काही प्रकार केला ती थेट पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे लग्नाच्याच दिवशी या नवरीवर व तिच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वधू शुभांगी शांताराम जरांडे (वय 23 वर्षे), वाहन चालक गणेश शामराव लवांडे (वय 38 वर्षे), व्हिडिओ ग्राफर तुकाराम सौदागर शेंडगे (वय 23 वर्षे) आणि वाहनातील इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस.एल.नेवसे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. भा.द.वि.चे कलम 269, 188, 269, 107, 336 व 34, आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड उपाययोजना या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील दिवेघाटातून एक नववधू चक्क चारचाकी वाहनाच्या बॉनेटवर बसून विवाहासाठी निघाली होती. तसा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या भोसरीतील असलेल्या या वधुचा मंगळवारी (दि. 13 जुलै) विवाह होता. त्यामुळे जुने दिवेघाटात फोटो काढण्यासाठी चारचाकी वाहनाच्या बोनेटवर बसून प्रवास केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी वाहनाच्या बोनेटवर बसली असून त्याचा व्हिडिओ शूट केला जात असल्याचे दिसत आहे. मात्र, वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात या वधूला आणि तिच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना कायद्याचा विसर पडलेला दिसत आहे.
दरम्यान, दिवे घाटातून निघालेल्या एका वाहन चालकाने मोबाईलमध्ये हा व्हिडिओमध्ये कैद केला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल लोणी काळभोर पोलिसांनी घेतली आणि याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एम.के. काटे करीत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक; बनावट नोटा बनवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, 32 लाखांच्या नोटा जप्त