पुणे - वाहनासमोर अचानक आलेल्या श्वानाला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट भुयारी मार्गात कोसळले. डेक्कन येथील गरवारे पुलावर शनिवारी (दि. 27 डिसें.) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज काळगुंदे (वय 24 वर्षे, रा. पाषाण) आणि इतर तिघे मित्र जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर घरी परतत असताना गरवारे पुलाजवळ त्यांच्या मोटारीसमोर अचानकन श्वान आडवे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार कठडा तोडून गरवारे अर्ध भुयारी मार्गात कोसळली. मोटारीचा आवाज ऐकून लोक धावत गेले. त्यांनी मोटारीतील चौघांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
हेही वाचा - दौंड येथे नदीपात्रात खोदकाम सुरू असताना सापडली महादेवाची मूर्ती
हेही वाचा - पुण्यात रखवालदाराचा खून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल