पुणे - पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही महापालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व उद्योगस कारखाने, औद्योगिक आस्थापना तत्काळ सुरू करता येतील. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील कुठल्याही कामगाराला कामावर जाण्याची परवानगी नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागातील लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले आहे. तसेच हे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील उद्योगधंदे सुरू करता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच हे उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारीक परनवागी किंवा पासची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ॲरेंजमेंट) करायला हवी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.