पुणे - देशाच्या सुरक्षेसाठी सीमा भागातील रस्ते वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती आणि खराब हवामानावर मात करून भारत-चीन सीमा रस्ता वेळेत पूर्ण करेल, अशी ग्वाही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
संरक्षण विभागाच्या जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (जीआरइएफ) सेंटर अॅण्ड रेकॉर्डसतर्फे 'चीफ इंजिनिअर्स २०१९' परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
श्रीपाद नाईक म्हणाले, की देशाच्या पूर्व आणि उत्तर-पूर्व भागामध्ये बीआरओ मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या निर्मितीचे काम करत आहे. त्याप्रमाणेच भारत-चीन सीमा भागातील रस्ते आणि रोहतंग बोगद्याचे कामदेखील सुरू आहे. या भागामध्ये काम करताना तेथील भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणाचा देखील विचार करावा लागतो. मात्र, तरीदेखील बीआरओ निर्धारित वेळेत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नाईक यावेळी म्हणाले.