पुणे - एका तरुणाने फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. समीर एकनाथ भसे (वय-२५), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून संबंधित पोस्ट प्रेमाबद्दल आहे. तसेच त्याने आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वी फेसबुकवर वाढदिवसाचा केक, चॉकलेट आणि अंगठीचे फोटो देखील पोस्ट केले होते. त्यामुळे ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
समीरने 'खर्या प्रेमाचा शेवट सुखद नसतो. कारण खरे प्रेम कधीच संपत नाही, अशा आशयाचा मेसेज फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपले जीवन संपवले. त्याने फेसबुकवर 'ती' च्या आठवणीत चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तो रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून इंदोरीच्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आला. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्यानंतर त्याने काही क्षणातच पुलावरून थेट इंद्रायणी नदीत उडी घेतली. शेजारी काही अंतरावर मासे पकडणारे व्यक्ती होते. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत समीर हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, संबंधित घटनेची माहिती इंदोरी गावात पसरली. समीरला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, तो सापडला नाही. अखेर एन. डी. आर. एफ. च्या पथकाला बोलवण्यात आले. त्यांनी ६ तास अथक प्रयत्न करीत सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
समीरने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आत्महत्या करण्याच्या काही मिनिटांपूर्वी प्रेमासंबंधीची पोस्ट केली आहे. त्यामुळे त्याने केलेली आत्महत्या ही प्रेमसबंधातून असावी, असा संशय पोलिसांना आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी -
मी समीर एकनाथ भसे आत्महत्या करत आहे. यास कोणीही जबाबदार नाही. मी माझ्या मर्जीने आणि स्वतःच्या इच्छेने जीवन संपवत आहे. यासाठी कोणाला जबाबदार धरू नये. मला जीवन संपविण्यासाठी कोणीही प्रवृत्त केले नाही. मी स्वतः हा निर्णय घेतला आहे. नाना, मम्मी मला माफ करा. मी तुम्हाला सोडून चाललोय.