बारामती - आध्यात्मिक जनजागृती बरोबर सामाजिक बांधिलकी तत्परतेने जोपसण्याचे महान कार्य संपूर्ण वैश्विक स्तरावर संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा छत्र छायेखाली अविरतपणे सूरू आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य, सध्याच्या कोवीड-१९ परिस्थितीमध्ये मदत कार्य इत्यादी समाजोपयोगी कार्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून अविरतपणे सूरू आहे.
सातारा झोनल प्रमूख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने बारामती येथील निरंकारी भवनात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात १०० निरंकारी महापुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये १० महिलांनीही रक्तदान केले आहे. हे शिबिर शासनाच्या नियमांचे पुर्णपणे पालन करून मंडळाच्या आदेशान्वये पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या शूभहस्ते झाले. यामध्ये प्रामुख्याने इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चांदूलाल सराफ रक्त पेढी बारामती यांचा सहभाग मोलाचा ठरला. रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. उल्हास टुले, व जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे या वेळी उपस्थित होते.सदरचे शिबीर व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक, सेवादल संचालक शशिकांत सकट, सेवादल शिक्षक बाळासाहेब जानकर, महिला अधिकारी वर्षा चव्हाण, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.