सांगली - 'वीज कनेक्शन तोडण्यासाठी याल, तर जोडे खाल' अशी भूमिका सांगली भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. कोल्हापुरी चप्पल दाखवत भाजप युवा मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन वीज वितरण कंपनीला इशारा देत, वाढीव वीज बिला विरोधात 'जोडे मारो'आंदोलन जाहीर केले आहे.
वीज तोडणी विरोधात जोडे मार..
वीज ग्राहकांना कोरोनाच्या लॉकडाऊन काळामधील प्रचंड प्रमाणात वाढवलेली वीज बिलं, वीज वितरण कंपनीकडून सर्व सामान्य ग्राहक आणि उद्योजकांनी पाठवण्यात आली आहेत. याबाबत सरकारकडून सवलत देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली होती. मात्र ऊर्जा मंत्र्यांनी वीजबिल सवलत होणार नसल्याचे जाहीर केल्याने, वीज वितरण कंपनीकडून थकीत वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा, इशारा वीज ग्राहकांना देण्यात आला आहे. यावरून जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चा सांगलीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली वीज कनेक्शन तोडणीच्या विरोधात "जोडे मार" आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.
वीज बिल माफीला फाटा-
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक माने म्हणाले, कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये जनता घरात होतीय. या दरम्यान विजेचा वापर फारसा झालेला नाही, तरीसुद्धा वीज वितरण कंपनीकडून प्रचंड प्रमाणात वाढीव वीज बिल पाठवण्यात आलेले आहे. राज्य सरकारकडून त्या काळातले तीन महिन्याची वीज बिल माफ करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सरकारने आता यातून माघार घेत विज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपा युवा मोर्चाच्या वतीने वीज कनेक्शन तोडणीच्या विरोधात आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांना फिरू देणार नाही-
सांगली शहरांमध्ये भाजपा युवा मोर्चाची अॅक्शन टीम तयार करण्यात आलेली आहे. जर वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी हे एखाद्या ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आल्यास त्यांना त्याठिकाणी जोडे मारून पळवून लावणार असल्याचं माने यांनी जाहीर केले आहे. तसेच प्रसंगी पालकमंत्र्यांनाही जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा देत सरकारने याची दखल घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्याची भूमिका घेऊन वीज बिल माफ करावे, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे माने यांनी स्पष्ट केले आहे.