पुणे - देशभराच्या आकडेवारीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांना उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना दिसतात. तसेच,महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही, अशी टीका भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली. महाराष्ट्रातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पुढाकाराने भोसरी येथे आज ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्री कोणत्याही समाजाची असुद्या, तिच्याप्रती समाजात आदर असलाच पाहिजे. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजमाता जिजाऊ यांचे संस्कार होते. महिलांच्या सुरक्षेप्रति ते नेहमी सजग राहत होते. मात्र आता त्याच्यांच महाराष्ट्रात, देशात सर्वाधिक महिलांवर अत्याचार होत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. त्याकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि महिलांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. अशी माहिती लांडगे यांनी दिली.
उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील घटना दुर्दैवी असल्याचे सागंत महाराष्ट्रातील वाढत्या घटनांबाबत महाविकास आघाडी सरकारला दिसत नसून ते झोपले आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महिलांना सुरक्षित वातावरण दिले नाही. तर भाजपाच्या महिला पदाधिकारी कायदा हातात घेतील, असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे. यावेळी महिला मोर्चोच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
या आंदोलनाला शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव आदी उपस्थित होते.