पुणे : कर्नाटक सरकारच्या वतीने शालेय शिक्षणातून सावरकर यांचा धडा काढण्यात आला आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे जर लंडनला असतील तर, त्यांनी फेसबुकवर त्यांची भूमिका मांडावी अशी खिल्ली बावनकुळे यांनी उडवली आहे. काँग्रेस पक्षाने जे कर्नाटकमध्ये केले, उद्या सर्व विरोधक हे देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर करतील अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस सरकार धर्मांतर विरोधी, गो हत्याविरोधी कायदे पारीत करीत आहे. सावरकर यांच्यावरील धडा शिक्षणातून काढून टाकणे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. ते आज पुण्यात माध्यामांशी संवाद साधत होते.
३ कोटी घरापर्यंत पोहचणार : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज खडकवासला मतदार संघात टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले की, मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. 2014 ते 2019 च्या निवडणुकामध्ये जो जाहीरनामा दिला होता, त्याप्रमाणे मोदी सरकारने काम केले आहे. राज्यातल्या ३ कोटी घरापर्यंत येत्या काळात भाजप पोहोचणार आहे, असे यावेळी बावनकुळे म्हणाले.
शिवसेना भाजपचा फेविकॉलचा जोड : जाहिरातीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, परिवारात काही ना काही कारणावरून मतभेद होत असतात. मात्र, शिवसेना भाजपचा जोड पक्का आहे. 2024 मध्ये भाजप सेना युती प्रचंड यश मिळवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज पुलाच्या उद्घाटनाला रवींद्र चव्हाण अनुपस्थित असल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. यावर बावनकुळे म्हणाले की, केंद्रीय निधीतून जेव्हा काही कामे होत असतात तेव्हा, काही राज्याचे लोक जात नाही. जेव्हा राज्याचे काम होते, तेव्हा केंद्राचे लोक जात नाही. त्यामुळे तसे काहीही नाही. जरी मतभेद झाले असेल तरी दोन्ही पक्षाचे नेते हे सक्षम आहे, असे यावेळी बावनकुळे म्हणाले.
जाहिरात वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न : श्रीकांत शिंदे यांच्याबाबतीत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत. एखादी घटना त्यांची इमेज डॅमेज करू शकत नाही. थोड्या गैरसमजामुळे काही फरक पडणार नाही. आज ना उद्या यावर पडदा पडलेला पाहायला मिळेल. अतिउत्साही कार्यकर्ते असतात. भावनेच्या भरात कोणी काही करत असते. मी सूचना दिलेल्या आहेत असे म्हणत त्यांनी जाहिरात वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.