पुणे - महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा नाही. आमचा पक्ष प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करेल. या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणी काही करावं लागणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी राजकारणाबाबतची खंत व्यक्त केली.
निसर्गाच संतुलन बिघडले आहे, तसे राजकारणाचे देखील संतुलन बिघडले असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे. राजकारणातील अशा प्रकारच्या बदलामुळे यापुढे नागरिकदेखील अधिक विचारपूर्वक मतदान करतील आणि जातीचं, पैशांचं राजकारण संपेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाहीत. खाते वाटप झाले ते चांगले आहे, त्याचा आनंद आहे. मंत्र्यांनी आता उत्तम काम करावे, नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन कामे पूर्ण करावीत, असा सल्ला देखील पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीला दिला. भाजपच्या 'ऑपरेशन लोटस्'वर बोलताना पाटील म्हणाले,
काही राज्यात उलट सुलट राजकारण चालत आहे. महाराष्ट्रात खूप प्रामाणिक पणाच राजकारण चाललं आहे. यावेळी काय झालं हे माहीत नाही. अवेळी पाऊस झाला... गारा पडल्या, त्या जशा अनाकलनीय आहे. तसं हे नागरिकांना अनाकलनीय आहे. मात्र, नागरिकांना दूध का दूध आणि पाणी का पाणी कळले आहे. तसेच आता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची मोट बांधून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकणे सोपे आहे. मात्र, नव्याने जेव्हा निवडणूक लढाल तेव्हा काय? त्यावेळी लोकांना माहीत आहे की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले.
तसेच नागरिकांनी निराश न होता अधिक सतर्क होऊन मतदान करायला हवे, भाबडे पणाने मतदान करून चालणार नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
केंद्र सरकारने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, चित्ररथाचा तांत्रिक विषय आहे. महाराष्ट्राचा यापूर्वी देखील अनेक वेळा चित्ररथ नव्हता. कारण ते रोटेशन असते. या सरकारमध्ये काय झालं आहे. कशाचं ही खापर आणून मोदींवर फोडतात, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, चित्ररथाचा विषय हा तांत्रिक असून दरवर्षी तीस ते चाळीस टक्के राज्याचे रथ येतात. अतिशय तांत्रिक रित्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल रोटेशनमधून बाहेर पडले. सगळ्या राज्याचे रथ म्हणजे कंटाळवाणे होऊ शकते इतके रथ चालले आहेत. बऱ्याच देशांचे प्रतिनिधी ते पाहायला येत असतात, असे स्पष्टीकरणही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.