पुणे (आळंदी ) Mid Day Meal Plan : महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार विभागानं घेतलेल्या निर्णयाविरोधात भाजपा आध्यात्मिक आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना अंड्यांऐवजी गायीचं दूध, सुका मेवा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंड्याबाबत 20 दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीनं दिला आहे. यावेळी आळंदी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह सहसंयोजक किशोर महाराज दोंडगे यांची उपस्थित होती.
'या' निर्णयाला आमचा विरोध : यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले, महाराष्ट्र सरकारनं एक दुर्दैवी निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात प्रथिनं मिळावी यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करण्यात आला आहे. यामागं सरकारची भावना चांगली असू शकते, मात्र या निर्णयाला आमचा विरोध आहे. प्रत्येकाला कौटुंबिक नियम असतात. महाराष्ट्रात घरोघरी वारकरी आहेत. तसंच देशात अनेक आध्यात्मिक पंथ, वेगवेगळे धर्म आहेत. त्यामुळं आध्यात्मिक नियमाप्रमाणं मांसाहार करणं वर्ज्य आहे. मात्र, सरकारनं निर्णय घेतल्यामुळं नकळत मुंलानी अंडी खाल्ल्यास त्यांच्या कुटुंबाचा शुद्ध शाकाहारी नियम मोडण्याचा धोका आहे. त्यामुळं सरकारनं तत्काळ हा निर्णय मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र : पुढं बोलताना तुषार भोसले म्हणाले याबाबतचं पत्र नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे. हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची विनंती आम्ही त्यांना केली आहे. अंड्या ऐवजी देशी गाईचे दूध, तूप, सुका मेवा देण्याची आमची मागणी असल्याचं देखील भोसले यांनी सांगितलं आहे. राज्यातील वारकरी संप्रदाय, साधू, संताची हीच भावना असेल अशी मला आशा आहे, असंही ते म्हणाले. सर्वांच्या भावनांचा आदर करून हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -