पुणे - महाराष्ट्रात ज्या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्या शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून दुजाभाव केला जात आहे. कोरोनाबाबत मदत असू द्या किंवा रेमडेसिवीर व लस असू द्या; प्रत्येक गोष्ठीतच राज्य सरकार दुजाभाव करत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. पुण्याच्या लसीकरणाबाबत आज (28 एप्रिल) भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केलीय. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारवर टीका
येत्या 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच काही सूचना देखील करण्यात आल्या आहेत. 1 मे नंतर सर्व पुणेकरांना लस मिळाली पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 1 तारखेनंतर जसजशी लस उपलब्ध होईल, तसतसे लसीकरण करण्याचे काम पुणे महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. मात्र लसीसाठी राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत आहे. राज्य सरकारचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पुण्यात ससून सोडून कुठेही राज्य शासनाच्यावतीने कोविडबाबत काम सुरू नाही, अशी टीका देखील यावेळी मुळीक यांनी केली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झोपी गेलेल्या अवस्थेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे झोपी गेलेल्या अवस्थेत आहेत. घरातून बाहेर देखील पडत नाहीत. फक्त भाजपावर टीका करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की आपण केवळ टीका करण्यापेक्षा बाहेर येऊन लोकांमध्ये काम केलं पाहिजे. आजची परिस्थिती खूप भयंकर आहे. लोकांना व्हेंटिलेटर भेटत नाही. रेमडेसिवीर भेटत नाही. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असेही यावेळी मुळीक म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 5 हजार सीसीसी बेड सुरू करणार
'पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाचे प्रतिनिधी तिथे गेले होते. तिथे प्रचार करणे ही आमची जबाबदारी आहे. परंतु आमच्या प्रतिनिधींनी जाताना प्रभागातील लोकांना विविध आरोग्य सुविधा तसेच मदत केंद्र देखील सुरू ठेवले होते. त्यामुळे पश्चिम बंगलला प्रचाराला जाणे त्यात काही गैर नाही. महापालिकेची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याची आहे. आम्ही कुठल्याही जबाबदारीपासून मागे हटत नाही. आम्ही पूर्ण क्षमतेने पुणेकरांना उपचार देत आहोत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 5 हजार सीसीसी बेड सुरू करण्यात येणार आहेत', असेही यावेळी जगदीश मुळीक म्हणाले.
लॉकडाऊन वाढविल्यास आर्थिक पॅकेज जाहीर करा
राज्य सरकारच्यावतीने 'ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत 1 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाची वाढती स्थिती पाहता अजून 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. राज्य सरकारने अजून 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला तर गोर गरोब, बारा बलुतेदार यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी देखील मुळीक यांनी केली.