राजगुरुनगर (पुणे) - श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेली खेड तालुक्यातील वाफगाव येथील ऐतिहासिक वास्तू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताब्यात असलेल्या रयत शिक्षण संस्थेला 1955 साली देण्यात आली. मात्र, 65 वर्षांच्या कार्यकाळात रयत शिक्षण संस्था भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे या काळात होळकरांचा इतिहास असलेल्या वास्तूचे जतन होऊन स्मारक व्हायला पाहिजे होते. मात्र, पवारांची धारणा व भावनाच नसल्याने होळकरांच्या वास्तूचे जतन व स्मारक करतील, अशी शरद पवारांकडून अपेक्षा नसल्याचे मत व्यक्त करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. पडळकर आज श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
होळकरांच्या वास्तूला स्मारकाचा दर्जा देण्यात यावा...
खेड तालुक्यातील वाफगाव येथे श्रीमंत मल्हारराव होळकरांनी उभारलेल्या होळकर वाड्यात श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला. या ऐतिहासिक वाड्याकडे शौर्य व ज्ञानाचे मंदिर म्हणून पाहिले जाते. मात्र या वाड्याची सध्याची अवस्था दुर्दैवी झाली असून या वाड्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारकडून तत्काळ 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन श्रीमंत यशवंतराव होळकर या वास्तूचे जतन करण्यात यावे. या वास्तूमध्ये सुरू असलेली रयत शिक्षण संस्थेची शाळा पर्यायी जागेत उभारावी व या वास्तूला स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या वेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
होळकरांच्या वास्तू या देशातील उपेक्षित, वंचित, गोरगरीब लोकांची अस्मिता
श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळावर पहिल्यांदाच होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान रयत शिक्षण संस्थेचा भ्रष्टाचार व होळकरांच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करून स्मारकाची मागणी करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवीन वादाला सुरुवात केली आहे. रयत शिक्षण संस्था ही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून आमचा गोरगरिबांच्या शिक्षणाला विरोध नाही. मात्र, होळकरांच्या वास्तू या देशातील उपेक्षित, वंचित, गोरगरीब लोकांची अस्मिता आहे. त्यामुळे या वास्तू जतन करण्यासाठी पुढील काळामध्ये मोठा लढा उभा करणार असल्याचेही यावेळी भाजपचे आमदार पडळकर यांनी सांगितले.
श्रीमंत यशवंतराव होळकरांचा 6 जानेवारीला राज्याभिषेक....
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्याला अटकेपार नेण्याचे कार्य श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी केले. त्यांच्या या कार्याचा मानसन्मान ठेवून रायगडावर ज्या पद्धतीने राज्याभिषेक सोहळा साजरा होतो, त्याच धर्तीवर प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला वाफगाव येथे श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळावर राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे भूषणसिंहराजे होळकर यांनी जाहीर केले. आज वाफगाव येथील होळकर वाड्यामध्ये श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भूषणसिंहराजे होळकर बोलत होते.