पुणे - महाराष्ट्रात लोकशाहीचा खून करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. कृत्रिम बहुमत दाखवून ते वाटेल ते निर्णय घेत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पुण्यात भाजप शहर पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर ते थेट सरपंच निवड पद्धती रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
या सरकारने प्रभाग पद्धत रद्द केली, थेट सरपंच निवड रद्द केली. मात्र, थेट सरपंच निवड पद्धती रद्द करण्याविरोधात 9 हजार ग्रामपंचायतींनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कृत्रिम बहुमतावर ते निर्णय घेत आहेत, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा - थेट सरपंच निवड रद्द; आता सदस्यच निवडणार सरपंच
भाजप कार्यकर्त्यांनी आता शिवसेना आणि ते सत्तेत कसे आले या विषयावर बोलणे बंद करावे आणि यांनी फसवले त्यांनी फसवले करत बसण्यापेक्षा त्यांच्या चुकीच्या निर्णयावर टीका करावी. कोणी कोणाला फसवले हे जनतेला माहीत आहे आणि जनता निवडणुकीत बरोबर धडा शिकवेल, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा - '... तर कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांना देखील बोलावलं जाईल'
एल्गार परिषद प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होणार असल्याच्या वृत्तावर बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. कोणी तरी अर्ज केला म्हणजे लगेच चौकशी, असा प्रकार आहे. चौकशी करायची तर करा कोणी अडवले. मात्र, चौकशी दोन-तीन दिवस न करता उगीच लांबवत ठेवायची आणि एखाद्याला बदनाम करायचे असा प्रकार यातून दिसत असल्याचे पाटील म्हणाले.