पुणे - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कोथरूड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने, कोथरूड मतदारसंघातील महिलांना साड्या वाटप करण्यात आले. बालेवाडीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या साड्या वाटल्या आहेत. साड्यांच्या बॉक्सवर नूतन वर्षांच्या शुभेच्छा देणारा मजकूर, भाजपचे कमळ चिन्ह आणि चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे.
मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे डबेवाले आणि घरकाम करणाऱ्यांना फराळ वाटप केले, त्याप्रमाणेच मी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा गरीबांच्या घरी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते, तसेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करा असेही त्यांनी सुचवले होते. या पार्श्वभूमीवर मी या उपक्रमाचे आयोजन केले होते. ही निवडणूक नाही, त्यामुळे हे नक्कीच मतांसाठी करत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच दिवाळीनिमित्त आपल्या घरी धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना भाऊबीजेनिमित्त साडी भेट द्यावी, असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
दरम्यान, भाजप कार्यालयात महिलांना बोलवून साडी वाटप केल्यामुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार आहे.
हेही वाचा : पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी