पुणे - विरोधी पक्षातील कोणी गंमतीनेही कधी सरकार पाडण्याचा विचार केलेला नाही. तरीसुद्धा कधी संजय राऊत, कधी शरद पवार तर कधी उद्धव ठाकरे वारंवार सरकार पाडून दाखवा, सरकार पाडून दाखवा असं का म्हणत आहेत. सरकार पाडण्याची भाषा कोणी केलीच नाही. त्यामुळे सध्या साप सोडून भुई थोपटणे नावाचा एक प्रकार सुरु असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच हे सरकार पाडून दाखवा, सरकार पाडून दाखवा अशी पैलवानकीची भाषा चालली आहे. हा सर्व प्रकार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा असल्याचेही पाटील म्हणाले.
चूक आहे त्याला चुकीचं म्हणणारच
उद्धव ठाकरेंना कोरोनामध्ये मुलाखत देता आली नाही. त्यांनी इतर कोणत्याही चॅनेलला मुलाखत न देता त्यांनी फक्त सामनालाच एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देवेंद्र आणि कंपनीने कोरोनावर राजकारण करू नये, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, लोकांनी आम्हाला मतदान केले. सत्ता दिली, दुर्दैवाने आम्ही विरोधी पक्षात बसलो. त्यामुळे आमची भूमिका जी आहे ती आम्ही पार पाडणारच असल्याचे पाटील म्हणाले. जे चूक आहे त्याला चुकीचं म्हणणारच. अंत्यसंस्काराअभावी मृतदेह रुग्णालयातच पडून आहेत. त्याच्याशेजारीच रुग्णावर उपचार सुरु आहेत. पुण्यासारख्या शहरात ऑक्सीजन बेड नाहीयेत, व्हेंटिलेटर नाहीयेत, याविषयी विचारणा करणे राजकारण असेल तर आम्ही ते करणार असेही पाटील म्हणाले.
पुण्याचे मुख्यमंत्री अजित पवार आहेत का?
खर्याला खरे बोलणाऱ्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला. अजित पवार हे सकाळी सात वाजता कामाला सुरुवात करणारे उपमुख्यमंत्री आहेत. मागील चार महिन्यात उद्धव ठाकरेंनी साधी व्हिडीओ कॉन्फरन्सही घेतली नाही. मुलाखतीत म्हणतात घरून काम चालवता येते तर मग पुण्यातील परिस्थितीवर आढावा बैठक का घेता नाही आली? असा सवाल पाटील यांनी केला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी जिल्हे वाटून घेतले आहेत का? काही जिल्ह्यात अजित पवार मुख्यमंत्री आणि काही जिल्ह्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असं आहे का? पुण्याचे मुख्यमंत्री अजित पवार आहेत का? त्यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यात बसलं पाहिजे. ते सकाळी सात वाजता दिवसाची सुरुवात करतात. त्यामुळे मी त्यांचे कौतुक करतो. दिवसाची तशी सुरूवात करणे उद्धवजींना जमत नसेल. पण अजित पवार करतात, असा टोलाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री पुण्याकडे दुर्लक्ष करून अजित पवार पुण्यात कसे अपयशी ठरले असे दाखवण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना? असेही पाटील म्हणाले.