दौंड (पुणे) - शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेला कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाजपा शिवार सभा, घोंघडी सभा घेणार आहे. तसेच या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या फायदा आहे की तोटा आहे, असे शेतकऱ्यांना विचारणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे पत्रही लिहून घेणार असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाच्यावतीने बळीराजा सन्मान आणि ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे आहेत. या कायद्यांना विरोध करणारे लोक हे शेतकरी विरोधी आहेत. शेतकरी गरीब रहावा, असे या लोकांना वाटते. गरीब राहिलेला शेतकरी यांना निवडणुकीत पाठीमागे फिरायला मिळतो, यामुळे हे उद्योग सुरू आहेत, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी सुज्ञ आहेत. यामुळे महाराष्ट्रात या कायद्यांना फारसा विरोध होताना दिसत नाही. यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेला कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाजपा शिवार सभा, घोंघडी सभा घेणार आहे. तसेच या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या फायदा आहे की तोटा आहे, असे शेतकऱ्यांना विचारणार आहे, असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुलापर्यंत ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार राहुल कुल, वासुदेव काळे, हर्षवर्धन पाटील, यासह भाजपा नेत्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून वरवंड ते चौफुला रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत 'मोदी है तो मुमकीन है', 'कृषी विधेयक एक वरदान' अशा घोषणा लिहिलेले फलक लावण्यात आले होते.
कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, आमदार सुजितसिंह ठाकुर, गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आदी. उपस्थित होते.