पिंपरी-चिंचवड (पुणे) - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाजप आक्रमक झाली असून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजप महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी गृहामंत्र्यांचा निषेध करत आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, एकनाथ पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभरात उडाली आहे खळबळ
परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी बार आणि हॉटेलमधून दरमहा 100 कोटी रुपये जमा करावेत, असा आदेश दिला होता. यावरून देशभरात खळबळ उडाली असून राजकीय पक्ष आणि नेते गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेध करत आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
लाजे खातर राजीनामा घ्या
यावेळी, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे म्हणाल्या की, अत्यंत दुर्दैवी घटना आहे की पहिल्यांदा अशा पद्धतीने गृहमंत्री पैशांची मागणी करत आहेत. त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा, मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीने लाजेखातर राजीनामा त्यांच्याकडून तातडीने घ्यावा. यातून पळवाट काढण्याच काम राष्ट्रवादीचे नेते आणि हे सरकार करत आहेत. त्या म्हणाल्या की, कित्येक महिने झाले महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. पण, गृहमंत्र्यांकडे वेळ नाही, कारण यांना पैसे मोजायचे आहेत. या घटनने महाराष्ट्राला कलंक लावला आहे, असेही खापरे म्हणाल्या.
हेही वाचा - अनिल देशमुखांविरोधात भाजपाची बारामतीत घोषणाबाजी
हेही वाचा - विनामस्क फिरणाऱ्या १०० लोकांवर दौंड पोलिसांची कारवाई