पुणे- राज्यातल्या जनतेला जून महिन्यात महावितरणने वीज बिलाच्या माध्यमातून धक्का दिला. याबाबत भाजप आक्रमक झाली असून या वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजपने राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुणे शहरातही पुणे जिल्हा भाजपच्यावतीने रस्ता पेठेतल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करुन आंदोलन करण्यात आले.
एप्रिलमध्ये वीज नियामक आयोग आणि ऊर्जामंत्री यांच्यामध्ये बैठक झाली होती. यात 5 ते 15 टक्के वीज बिलात कपात करण्यात येईल, अशी घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र, या घोषणेला हरताळ फासत सामान्य ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.
शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारचे मोजमाप न करता अन्यायकारक वीज बिल देण्यात आले आहे. वाढीव वीज बिलाचा भाजपने कडाडून विरोध केला आहे. ही बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने ती त्वरित मागे घेऊन लॉकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलाच्या निषेधात पुण्यातील रास्ता पेठ येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. वाढीव वीज आकारणी बिलाची होळी करुन निषेध केला. यावेळी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.