पुणे - पाण्याच्या शोधार्थ बिबट्याचे दोन बछडे २० ते २५ फुट खोल रिकाम्या पाण्याच्या टाकीत पडल्याची घटना सोमवारच्या रात्री जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गुळूंचवाडी येथे घडली. हे २ बछडे १ वर्ष वयाची असल्याचा अंदाज आहे. अद्यापही या बछड्यांना बाहेर काढण्यात आले नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यातच जंगलात वास्तव्य करणारा बिबट पाणी व भक्षाच्या शोधात लोकवस्तीत वास्तव्य करू लागला आहे. मात्र, लोकवस्तीत या बिबटला भक्ष व पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बिबट्याच्या संवर्धनासाठी वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहे
पाणी व भक्ष्याच्या शोधात सोमवारी रात्री भटकंती करत असताना अचानक बिबट्याची पूर्ण वाढ झालेले दोन बछडे पोल्ट्री फार्मसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकित पडले. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नसल्याने दोन बिबट बछडे २० ते २५ फुट टाकीमध्ये पडले आहे. वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असुन बिबट्यांच्या बछड्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पाण्याच्या टाकीत पडलेल्या बछड्यांना बेशुद्ध करूनच बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानुसार रेस्क्यू सुरू असल्याची माहिती वनविभागकडुन देण्यात आली आहे. मात्र, गेल्या १५ ते १८ तासांपासून बिछड्यांना पाणी व भक्ष्य मिळाले नाही. त्यामुळे बछड्यांपासुन हल्ल्याची भिती असल्याची चर्चा परिसरात आहे.