पुणे : Bengali Durgotsav In Pune : सध्या देशभरामध्ये मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. विविध शहरात तसेच राज्यात त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार नवरात्र उत्सव साजरा होत आहे. पुण्यात देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. दरम्यान, येथील विमाननगर येथे गेल्या 19 वर्षांपासून मोठ्या उत्साहात बंगाली दुर्गोत्सव साजरा केला जात आहे.
कोलकाताच्या धर्तीवर पुण्यात दुर्गोत्सव : या दुर्गोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे, पाच दिवसांचा हा महोत्सव असतो. यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोलकाता येथे ज्या पद्धतीने दुर्गोत्सव साजरा केला जातो, त्याच धर्तीवर पुण्यातही तो साजरा केला जातो आणि मोठ्या उत्साहात यामध्ये नागरिक सहभागी होतात.
विविध पूजा, धार्मिक कार्यक्रम आणि अन्नदान : देशभरातील विविध लोक हे पुण्यात नोकरीसाठी आले आहेत. शिक्षण तसेच नोकरी करत असताना विविध सण उत्सवाच्या वेळी घरी जाता येत नसल्याने 19 वर्षांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या बंगाली लोकांनी एकत्र येत नवरात्र उत्सवात दुर्गोत्सव सुरू केला. येथे शहरातील तसेच विविध ठिकाणाहून लोक या दुर्गोत्सवात येत असतात. याबाबत अध्यक्ष अप्रजिता दास म्हणाल्या की, हा दुर्गोत्सव सुरू करून आम्हाला 19 वर्ष झाले. सुरुवातीला जेव्हा हा महोत्सव सुरू केला होता, तेव्हा छोट्या स्वरूपात होता. आज पाहता पाहता हा दुर्गोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. या दुर्गोत्सवात दररोज विविध पूजा, धार्मिक कार्यक्रम आणि अन्नदानाचे आयोजन केलं जातं.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचा सहभाग : याबाबत कल्चर कमिटीच्या पदाधिकारी सुवाश्री डे म्हणाल्या की, आम्ही जेव्हा नोकरीनिमित्त इथं आलो तेव्हा आम्ही ठरवलं की आपल्या पद्धतीने नवरात्र उत्सव सुरू करायचं आहे. म्हणून आम्ही या दुर्गोत्सवाला सुरुवात केली. आम्ही या दुर्गोत्सवाला सष्टीपासून सुरू करतो आणि पुढील पाच दिवस ही पूजा चालत असते. यामागील कारण एकच आहे की, कामानिमित्त आम्ही सर्वजण पुण्यात राहत असतो. त्यामुळे वेळ नसल्याने आम्ही हा दुर्गोत्सव पाच दिवसांचा साजरा करत असतो आणि या दुर्गोत्सवाला छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ सर्वच येत असतात.
हेही वाचा:
- Gupt Navratri 2023 : 19 जूनपासून सुरू होत आहे गुप्त नवरात्र; जाणून घ्या घटस्थापनेची वेळ आणि पूजेची पद्धत
- Chaitra Navratri 2023 : कधी सुरु होणार चैत्र नवरात्र? काय आहे शुभ मुहूर्त आणि श्री रामनवमी तिथी
- Chaitra Navratri 2023 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवसंवत्सरला सुरुवात; राजा बुध आणि मंत्री शुक्राची दोस्ती घेऊन येईल आनंद