पुणे - किल्ले शिवनेरीच्या कडेलोट परिसरात मोहळावरून उठलेल्या माशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. यात जीव वाचवण्यासाठी तेथून पायथ्याच्या दिशेने पळत सुटलेल्या पर्यटकांसोबत आलेल्या माशांमुळे पायरीमार्गाजवळील ७५ ते ८० पर्यटक जखमी झाले. जखमींना अॅम्बुलन्स तसेच वनविभागाच्या गाड्यांमधून उपचारासाठी जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ३५ जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली.
मधमाशांच्या हल्ल्यानंतर काही जण पडले बेशुद्ध
मुंबई, पुणे, राजगुरुनगर तसेच राज्याच्या विविध भागांतून रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने शिवनेरीवर आले होते. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर काही जण बेशुद्ध पडले, काही जणांना उलट्या झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान जखमींना खाली आणण्यासाठी वनविभाग आणि
पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. १० दिवसांपूर्वीच सहलीतील ३० शालेय विद्यार्थ्यांवर अंबाअंबिका लेणी परिसरात मधमाशांचा हल्ला झाला होता.