बारामती (पुणे) - बारामती आणि फलटण या दोन तालुक्यातील अनेक गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने बससेवा सुरू केली आहे. एसटी कायम सुरू रहावी यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करून जास्तीतजास्त प्रवास एसटीने करावा, असे आवाहन एसटीचे पुणे जिल्हा विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.
बारामती तालुक्यातील मुरूम येथे बारामती-सोमेश्वरनगर-साखरवाडी-सुरवडी या मार्गावरील नवीन एसटी बससेवेचा शुभारंभ नुकताच झाला. त्यावेळी गायकवाड बोलत होते. या वेळी, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, ज्येष्ठ ग्रामस्थ शरदराव चव्हाण, रंगराव जगताप, महादेव कदम, ग्रामपंचायत सदस्य, निलेश शिंदे, माजी सरपंच प्रदीप कणसे, महादेव निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने फडणवीस यांचा सल्ला घ्यावा - नरेंद्र पाटील
बसच्या दिवसभरात तीन फेऱ्या होणार
ही बस बारामती डेपोतून निघून माळेगाव, पणदरे, कोऱ्हाळे, करंजेपुल चौकातून सोमेश्वर कारखाना, वाणेवाडी, मुरूम आणि फलटण तालुक्यातील मुरूम, खामगाव, साखरवाडी आणि सुरवडीपर्यंत ही बस जाणार आहे. त्याच मार्गे ही बस परत येणार आहे. या मार्गावर बसच्या दिवसभरात तीन फेऱ्या होणार आहेत. सोमेश्वरनगर, माळेगाव आणि बारामती शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना थेट गावातूनच बस उपलब्ध झाल्याने याचा मोठा फायदा होणार आहे. पहिल्यांदाच या मार्गावर बससेवा सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना बसचा फायदा
दळणवळणासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरीकांसाठी निरा नदीवर मोठा पूल उभारण्यात आल्याने निरा आणि सांगवीवरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनाही या बसचा फायदा होणार आहे. मुरूमचे माजी सरपंच प्रदीप कणसे यांनी डेपो मॅनेजर तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही बससेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा केला होता. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
रस्ता दुरुस्तीची गरज
एसटी बससेवा सुरू झाल्याचे समाधान आहे. मात्र मुरुमच्या निरा नदीच्या पुलावरून फलटण तालुक्यात प्रवेश करतानाच आरधा किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कित्येक वर्षापासून या रस्त्याचे काम झालेले नाही. रस्ता खड्यात का खड्डा रस्त्यात हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. फलटण तालुक्यातील नेत्यांनी येथील रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न केला तर या मार्गावरील प्रवास सुखकर होईल.
हेही वाचा - "पवार युपीएचे अध्यक्ष झालेले आम्हाला आवडेल; तसा प्रस्ताव आल्यास आम्ही पाठिंबा देऊ"