पुणे(बारामती) - बारामती शहर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराकडून 20 तलवारींसह एक गावठी पिस्तुल जप्त केले. नितीन मल्हारी खोमणे (वय 25, रा. पिंपळी, ता. बारामती) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. एकाच वेळी 20 तलवारी जप्त केल्याची पुणे ग्रामीणमधील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
आरोपी हा पिंपळीतून बारामती शहरात तलवारी विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार शिवाजी निकम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, निकम, अकबर शेख, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अतुल जाधव, होमगार्ड साळुंके यांनी बांदलवाडीत निरा डावा कालव्यालगत सापळा रचला. खोमणे हा दुचाकीवरून येत असताना त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील गोणीत तब्बल 20 तलवारी मिळाल्या. याशिवाय एक पिस्तुलही मिळाले. त्याने या तलवारी अमृतसर (पंजाब) येथून बारामतीत विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा, मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खोमणे याच्या विरोधात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.