बारामती - बारामती शहरातील मटका व्यवसायिक कृष्णा जाधव या खून खटला प्रकरणी फरारी आरोपीला तब्बल दोन वर्षांनी अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मोठा बिट्या उर्फ सचिन रमेश जाधव (वय २७, रा. कॉलनी, तांदुळवाडी, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण -
कृष्णा जाधव यांना गुन्ह्यातील २१ आरोपींनी ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तेव्हा जाधव यांनी ती रक्कम देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन आरोपींनी संगनमत करुन कट रचला आणि ५ नोव्हेंबर २०१८ रोजी कृष्णा जाधव यांचा धारदार हत्याराने वार करुन खून केला.
या खुनाबाबत जाधव यांची पत्नी सपना जाधव यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात एकुण २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये एकूण ४ विधीसंघर्षीत बालक होते. त्यानंतर तर सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे वाढीव कलम लावून गुन्ह्यास मोक्का लावण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पूर्वीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी तपास केला आहे. यामध्ये शिरगांवकर यांनी आजपर्यंत गुन्ह्यातील १७ आरोपीस अटक करून मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.
गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी क्रमांक ११ मोठा बिटया उर्फ सचिन रमेश जाधव हा खून झाल्याच्या दिवशीपासुनच फरार झालेला होता. तसेच त्याने स्वत:कडील मोबाईल क्रमांक बंद करून इतर नातेवाईक, मित्रांशी संपर्क करण्याचे बंद केलेले होते. मात्र, तो सोलापूर शहरातील सलगरवस्ती परिसरात राहत असल्याची माहिती सोलापूर शहर पोलिसांनी कळविले होती. त्यानंतर शहर पोलिसांनी सलगरवस्ती पोलीस ठाणे यांचे मदतीने फरार आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस मोक्का न्यायालयाने ६ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.