पुणे - दौंड तालुक्यातील शिरापूर आणि हिंगणी येथे भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱयांवर मोठी कारवाई बारामती गुन्हे शाखेने केली आहे. या कारवाईत 31 बोटी, सहा वाळूने भरलेले ट्रक, तीन जेसीबी मशीन जप्त करण्यात आले आहेत. याबाबत 17 आरोपींविरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - '..या बाबतीत फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवले'
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील शिरापूर आणि हिंगणी येथे भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची गोपनिय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. नंतर त्यांनी बारामती गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी छापा मारण्याबाबत सांगितले. त्यांनी त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीत शिरापूर- हिंगणी येथे जाऊन माहिती घेतली. त्यानंतर बारामती गुन्हे शाखेचे पोलीस जवान आणि जलद कृती दलाचे 20 जवान यांच्या मदतीने अचानक छापा टाकला.
यावेळी भीमा नदी पात्रात आरोपी हे वाळू उत्खननाची परवानगी नसताना बेकायदेशीर यांत्रिक बोटीने वाळू उपसा करून जेसीबी आणि इतर यंत्रांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून चोरी करत असताना पोलिसांना दिसले.
सदर ठिकाणी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला -
- 1) 19 फायबर लोखंडी बोटी प्रत्येकी किंमत सहा लाख
- 2) 10 लहान बोटी प्रत्येकी किंमत तीन लाख रुपये
- 3) दोन हायड्रोलिक फायबर बोट प्रत्येकी किंमत बारा लाख
- 4) 3 लाख 10 हजार रुपये किमतीची 62 ब्रास वाळू
- 5) 42 लाख रुपये किमतीचे सहा ट्रक
- 6) तीन जेसीबी मशीन
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण 2 कोटी 43 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण 17 आरोपींविरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष लंगुटे, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 15 पुरुष 5 महिला पोलीस जवान यांनी केली आहे.
हेही वाचा - महापूरानंतर सांगलीचे दूध उत्पादन घटलं,प्रतिदिन दीड लाख लिटर दुधाची घट...
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, अजय अधिकारी, अझीझ शेख, गाढवे, थोरात, रमेश काळे भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस जवान हेमंत जाधव, सचिन शिंदे, काळभोर यांनी मदत केली.
महसूल पथकाचे मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी सदर कारवाईवेळी मदत केली. सदर जप्त बोटी महसूल विभागाच्या नमूद पथकाच्या मदतीने नष्ट करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.