बारामती- चंदन चोरी प्रकरणी आरोपीचा शोध सुरू असताना बारामती तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत एक संशयित चंदनाच्या झाडांची रेकी करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने बारामती शहर व परिसरात ७ ते ८ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. बेरड्या ऊर्फ नियोजन संदीप भोसले (२८) रा. सोनगाव ता. बारामती असे आरोपीचे नाव आहे. ८ घरफोड्या करून चोरलेले २ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलिसांनी अन्य एका प्रकरणात आणखी एका चंदन चोराला बेड्या ठोकल्या आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांदुळवाडी रोड येथील सावंत विश्व बंगल्यासमोरील एका चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी सचिन नवनाथ शिंदे (३४) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून २ हजार रुपये किमतीची दोन चंदनाचे ओंडके व गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किमतीची कार पोलिसांनी जप्त केली आहे.
मोबाईल चोर अटकेत- बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेतील मोबाईल दुरुस्तीचे दुकान फोडून ३ लाख ४४ हजार ३३३ रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ४१ मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार ११ नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती. पोलिसांनी बालाजी ऊर्फ बाल्या अनिल माने याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आतिफ नजामुद्दिन तांबोळी, साहिल अय्याज शकीलकर, प्रतीक दिलीप रेडे, अनिकेत गायकवाड, सलमान बागवान यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई-
शहरातील समर्थनगर येथे गांजा विक्री होत होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी छापा टाकून अमित अनिल धेंडे (३७) याच्याकडून १२ हजार २०० रुपये किमतीचा ६१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
बुलेट चोरणारा गजाआड -
बारामती शहरातील भिगवण रोड येथून एक व्यक्ती बुलेट चोरून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शोध पथकाने कसबा येथे एका व्यक्तीला बुलेटसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रे मागितल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. गाडीच्या चेचीस व इंजिन नंबरवरून ही गाडी चोरीची असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हेही वाचा- अखेर सोमवारपासून राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी, मात्र 'या' नियमांची अट