पुणे - बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक माने यांनी कार्यकर्ते व पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने त्यांची अर्ध नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला होता. यावेळी बसपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली होती. या प्रकारानंतर माने यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.
यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माने म्हणाले, मी बारामती विधानसभा मतदार संघाचा 'बसप'चा अधिकृत उमेदवार असूनही, बारामतीतील बसपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इतर पक्षाशी हात मिळवणी करत होते. हा सर्व प्रकार माझ्या निदर्शनास आल्यानंतर, मी हा सर्व प्रकार पक्षाच्या वरिष्ठांना सांगितला होता. यासोबतच, मी पक्षाचा राजीनामा दिला असून माझी उमेदवारीही मागे घेत असल्याचे वरिष्ठांना सांगितले होते. हे सर्व स्पष्ट केल्यानंतरच मी अजित पवारांना पाठिंबा दिला. हा पाठिंबा पक्षाचा नसून माझा वैयक्तिक होता.
प्रतिनिधी फॉर्मचा काळाबाजार चालतो हे मला येथे आल्यानंतरच पहिल्यांदा समजले. त्यानंतर सतर्क राहून मी तालुक्यात माझ्या विचारांचे कार्यकर्ते नेमले. त्यामुळे, प्रतिनिधी फॉर्मचा काळाबाजार होऊ शकला नाही. या गोष्टीचा राग मनात धरून काही गावगुंडांना हाताशी घेत माझ्याशी हे नीच कृत्य करण्यात आले, असेही अशोक माने यांनी सांगितले.
हेही वाचा : बारामती: बसप उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याच्या संशयावरून नेत्याची अर्ध नग्न धिंड