पुणे (पिंपरी-चिंचवड)- मावळ तालुक्यातील संबळगड उर्फ विसापूर येथे शिवकाळात एक परंपरा सुरू करण्यात आली होती. या परंपरेत लोहगडवाडीचे पाटील हे दसऱ्याच्या दिवशी सकाळी विसापूर दुर्गावर येऊन नारळ फोडून उत्सव साजरा करायचे. मात्र, कर्नल प्रॉथर यांनी १८१८ साली विसापूर जिंकले व त्यानंतर ही परंपरा खंडित झाली. मात्र, बजरंग दलाच्यावतीने ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. २०१ वर्षानंतर गेल्या वर्षीपासून ही परंपरा सुरू करण्यात आली असून, किल्ले विसापूरवर लोहगड वाडीच्या साबळे पाटलांना बोलावून त्यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.
दसऱ्यानिमित्त गडावर शस्त्रपूजन करण्यात आले. महादेवाच्या पिंडावर दुग्धाभिषेक घालण्यात आला. कोरोनामुळे हा उत्सव मोजक्या मंडळीच्या उपस्थितीतच करण्यात आला. यावेळी शिवकालीन पाटलांचे वंशज गणेश साबळे उपस्थित होते. त्याचबरोबर, बजरंग दलचे मंत्री संदेश भेगडे, नंदकुमार काळोखे, सर्प मित्र निलेश गराडे, विश्व हिंदू परिषदेचे मंत्री गोपिचंद महाराज कचरे, महेंद्र असवले, सागर कटके, सुरेश ठाकर, सुभाष भोते, साई डांगले, विश्वास दळवी यांच्यासह आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर कटके यांनी केले, तर नंदकुमार काळोखे यांनी आभार मानले. यावेळी इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद सोमनाथ बोराडे यांनी विसापूर किल्ल्याचा इतिहास उपस्थितांना सांगितला.
हेही वाचा- 'कोरोनाच्या बाबतीत गाफील राहू नका; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या'