पुणे - प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर हे आपल्या गाडी चालकाकडे आत्महत्येची चिठ्ठी ठेवून बेपत्ता झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. याप्रकरणी त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहेत.
गौतम पाषाणकर (वय 64) हे पाषाणकर ऑटो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते बांधकाम व्यवसायिकही आहेत. बुधवारी दुपारी ते लोणी काळभोर येथील त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. त्यानंतर तेथून ते जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात आले. बुधवारी सायंकाळी त्यांनी मोटार चालकाला एक लिफाफा देऊन घरी देण्यास सांगितला. तसेच तुझे काही काम असेल तर करून ये, असे चालकाला सांगत मी पायी घरी येतो असे म्हणाले. त्यानुसार चालकाने तो लिफाफा घरी दिला. पाषाणकर कुटुंबियांनी तो लिफाफा उघडून पहिला असता त्यात गौतम यांनी व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
कुटुंबीयांनीही गौतम यांची शोधाशोध केली परंतु ते सापडले नाहीत. अखेर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गौतम पाषाणकर कुणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (020 - 25536263) या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.