पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांच्यासह 5 जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री कुलगुरूंसह कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा अधिकारी सुरेश भोसले आणि सुरक्षारक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत यांच्यावर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आकाश भीमराव भोसले (वय 25) यांनी तक्रार दाखल केली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये (भोजनगृह) निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तर त्याचवेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी पुणे न्यायालयात धाव घेऊन विद्यापीठ प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली होती.
या प्रकरणावरील सुनावणीनंतर कुलगुरूंसह 5 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा कुलगुरुंसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.