पुणे - बँकेचे एटीएम स्कॉर्पिओ लाऊन ओढून नेण्याचा प्रकार मंचर येथे उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री मुळेवाडी परिसरातील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन एका महाभागाने चारचाकीने ओढून पळवून नेले. यामध्ये पाच लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. याबाबत प्रकाश पाटील यांनी तक्रार दिली असून त्यानुसार मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी रात्री एका चोरट्याने एटीएम मशिनला दोरी बांधली. यानंतर पांढऱ्या स्कॉर्पिओने ते ओढून फिल्मी स्टाईल चोरी केली. संबंधित मशिन चोरट्यांच्या टोळीने लंपास केले. हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र आरोपींनी चेहरे झाकल्याने त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
पुन्हा तीच चोरीची स्टाईल
आठ दिवसांपूर्वी राजगुरुनगर येथील पाबळ रस्त्यावर असाच प्रकार घडला होता. याठिकाणी आयडीबीआय बँकेचे एटीएम स्कॉर्पिओ गाडीने ओढून नेण्यात आले होते. मात्र बँकेचे सायरन वाजल्याने चोरीचा प्रयत्न फसला होता. पुणे ग्रामीण पोलीस एटीएम चोरांचा शोध घेत असतानाच बुधवारी रात्री मंचर येथे एटीएम मशीनसह पैसे पळवल्याची घटना घडली. त्यामुळे सध्या एटीएम मशिन चोरट्यांच्या सक्रिय टोळीकडून लक्ष केले जात आहे. आता या चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.