पुणे - शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आपले सौंदर्य आणि बुद्धीमतेच्या जोरावर 'रिनिंग मिसेस इंडिया २०१९' हा किताब पटकावला आहे. १४ जुलैला पुण्यातील ऑर्किड हॉटेलमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

समाजात पोलिसांची एक वेगळी प्रतिमा आहे. शिस्तप्रिय आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. मात्र, यापलीकडे पोलीस दलातील काही कर्मचारी आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यात यशस्वी देखील होतात.
शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी सौदर्य आणि बुद्धीमतेच्या जोरावर 'रिनिंग मिसेस इंडिया २०१९' हा किताब पटकावला आहे. यामुळे त्यांचा परेड मार्च ते रॅम्प वॉक हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मूळच्या कराडच्या असलेल्या प्रेमा पाटील यांचे एम.कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मागील ९ वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत आहेत. त्या कार्बानरी या सामाजिक संस्थेशीही संलग्न आहेत. सामाजिक काम करत असताना पुणे व पुण्याबाहेरच्या गरीब गरजू मुलांना त्या शिकवतात. नृत्य व हजरजबाबीपणामुळे त्या या स्पर्धेमध्ये सरस ठरल्या बाहेत.