पुणे - बाजार समित्या बरखास्त करण्याच्या जो निर्णय घेतला जात आहे, त्यातून नेमके बाजार समित्या की, बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करणार याबाबतची स्पष्टता होत नाही. बाजार समित्या राहणार नसतील तर शेतकऱ्यांनी माल विकायचा कोठे? याबाबतचा प्रश्न चर्चेला जात असल्याचे वक्तव्य बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्या बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता हा निर्णय घेतला असल्याचे वक्तव्य बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महावीर शहा यांनी केले. तसेच बाजार समित्या बंद करण्याच्या निर्णयाचा व्यापाऱ्यांना फायदा न होता मोठ्या कंपन्यांना फायदा होईल. लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना हा निर्णय अत्यंत घातक असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - सत्ता स्थापनेविषयी शरद पवारांचा मोठा खुलासा; वक्तव्यामुळे संभ्रम
हेही वाचा - अकोल्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच कार्यालयात कोंडले
बाजार समित्या बरखास्त करण्यासाठी देशातील सर्वच राज्य सरकारबरोबर बोलणे चालू असून अनेक राज्य सरकारची या निर्णयाला सहमती आहे. त्यानुसार ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) प्रभावीपणे राबवायची आहे. असे मत नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या ग्रामीण आणि कृषी वित्त परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. या निर्णयावर अनेकांनी टीका केल्याचे पाहायला मिळते आहे.
शेतकऱ्यांच्या शेती मालाची विक्री करण्यासाठी त्या-त्या राज्य राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती केली आहे. त्यानुसार काही काळ उद्देशानुसार कामकाज चालले. मात्र, नंतर बाजार समितींच्या अकार्यक्षमतेमुळे दिवसेंदिवस अनेक समस्या निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे शेतकरी हितासाठी केंद्र सरकारमार्फत ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात, असल्याचे सीतारामन यांचे म्हणणे आहे.