पुणे - सैन्यदलात ब्रिगेडियर पदावर कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याने पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास उद्यान एक्सप्रेसच्या खाली उडी मारून आत्महत्या केली. अनंत नाईक असे आत्महत्या केलेल्या ब्रिगेडियरचे नाव आहे. ते एएफएमसीमध्ये अॅडमिनिस्ट्रेशन विभागाचे प्रमुख होते.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट -
अनंत नाईक हे आज सकाळी शासकीय गाडी घेऊन पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी सोबत असलेल्या चालकाला एमसीओतुन जाऊन येतो असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 येथे उद्यान एक्सप्रेस समोर उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी पुणे रेल्वे स्थानकावरच चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी झाला नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अनंत नाईक यांच्या परिवाराला या घटनेविषयी माहिती देण्यात आली. त्यांच्या मुलाने आम्ही येईपर्यंत शवविच्छेदन करू नये, अशी विनंती केली. त्यानुसार उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे.