पुणे - इलेक्ट्रि्क आणि हायब्रिड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि तिची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स 2 ही योजना सुरू केली आहे. यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने 600 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होण्याकरिता केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केला होता. यालाच अनुसरून 12 मीटर, एसी, विथ ऑटो ट्रान्समिशन बीआरटीच्या 150 इलेक्ट्रिक बस जीसीसी तत्त्वावर घेण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये प्रतिबस 55 लाख रुपये अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.
केंद्र सरकारच्या फेम 2 योजनेच्या मान्यतेसाठी 1 नोव्हेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत जीईएम पोर्टलवर निविदा राबविण्यात आली होती. परंतु, किफायतशीर दर प्राप्त न झाल्याने ही निविदा प्रक्रिया महामंडळाकडून रद्द करण्यात आली होती आणि डिपार्टमेंट ऑफ हेवी इंडस्ट्रीजलाही याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार, नव्याने निविदा प्रक्रिया राबवून 31 डिसेंबर 2020 पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. आता संचालक मंडळाने या बाबत नव्याने प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या निविदेमध्ये मे. ईव्हीईवाय ट्रान्स प्रा. लि यांची निविदा पात्र होऊन त्यांचे अंतिम दर 63.95 रुपये प्रति किलो मीटर विदाऊट इलेक्ट्रिसिटी मान्य करण्यात आले आहेत.
हेही वाचा - 22 ग्रीन महामार्ग वाहतूक आणि प्रवासी क्षेत्रात गेम चेंजर ठरतील - गडकरी
पुढील वर्षात सप्टेंबरअखेर 75 बस आणि डिसेंबरअखेरपर्यंत उरलेल्या 75 बस येणार
मे. ईव्हीईवाय कंपनीला 150 ई-बसेसची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत 75 बसेस आणि डिसेंबर अखेरपर्यंत उरलेल्या 75 बसेस अशा 150 बसेस महामंडळाच्या संचलनात उपलब्ध होणार आहेत. या 150 ई-बसेसपैकी पुणे महापालिकेच्या हद्दीत 90 आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 60 बसेस संचलनात राहणार आहेत. तसेच, या ई-बसेस प्रतिदिवशी 225 किलोमीटर धावणार आहेत.
यापूर्वी 150 ई-बसेस जीसीसी तत्त्वावर आणल्या होत्या.
यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे 2018-19 मध्ये दीडशे ई-बसेस जीसीसी तत्त्वावर संचलनात आणल्या होत्या. या वर्कऑर्डरमुळे एकूण 300 बसेस महामंडळाच्या संचलनात राहणार असून थोड्याच कालावधीत अजून बारा मीटर बीआरटीच्या साडेतीनशे ई-बसेस भाड्याने घेण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे भारतात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अंतर्गत 650 बसेस येतील. इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस असणारी ही सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था होणार असून यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील सर्व नागरिक तसेच औद्योगिक क्षेत्राला याचा उपयोग होणार आहे.
हेही वाचा - 2021 मध्ये मुंबईकरांचा प्रवास होणार 'सुसाट' आणि 'सुकर'! 'हे' प्रकल्प सेवेत दाखल