पुणे - रेल्वे मार्गाच्या कामासाठी दौंड येथील भीमा नदीच्या पात्रात खोदकाम सुरू आहे. या कामादरम्यान महादेवाची मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती अंदाजे एक ते दीड टन वजन आणि पाच फूट उंचीची आहे. याबाबत नागरिकांना माहिती मिळाल्याने आज नदीपात्रात मूर्ती पाहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ही मूर्ती नेमकी कोठून आली? हा प्रश्न उद्भवला आहे.
हेही वाचा - सात वर्षीय मुलीला श्वानाने घेतला चावा; श्वान मालकावर गुन्हा दाखलबारामतीत अजित पवारांची 'अशीही' बॅटिंग
पोकलेन मशीनच्या साहायाने खोदकाम सुरू असताना अंदाजे १० फूट खोलीवर महादेवाची ही मूर्ती सापडली. मूर्ती आढळून आल्यानंतर मशीनवरील ऑपरेटर आणि इतर लोकांनी ही मूर्ती बाहेर काढून ठेवली आहे. प्रथमदर्शनी मूर्ती सिमेंट, विटा, वाळू यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात आल्याचे दिसत आहे, तर काही भाग हा दगडापासून तयार करण्यात आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नदीपात्रात सापडलेली मूर्ती पूर्ण आहे की, महादेवाच्या पूर्ण स्वरुपातील मूर्तीचे शीर आहे? याबाबत तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत.
मूर्ती कोठून आली?
नदीपात्रात सापडलेली महादेवाची मूर्ती ही सुमारे १०० ते १५० वर्ष जुनी असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाच फूट उंचीच्या मूर्तीचे अंदाजे वजन एक ते दीड टन असावे. ही मूर्ती नदीपात्रात कोठून आली, की येथेच नदीपात्रात महादेवाचे जुने मंदिर आहे, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. काही जणांच्या मते ही मूर्ती पुरात वाहून आली असावी, तर काही जण ही मूर्ती म्हणजे मंदिरावरील शिखर असावे, असा अंदाज व्यक्त करत आहेत.
नागरिकांची मूर्ती पाहाण्यासाठी गर्दी
दौंड शहर आणि परिसरातील नागरिकांना नदीपात्रात खोदकाम सुरू असताना मूर्ती सापडली असल्याची माहिती समजल्याने नदीपात्रात मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र दिसले. तसेच, अनेकजणांना मूर्ती सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
हेही वाचा - बारामतीत तांबड्या मक्याची विक्रमी आवक, बंद असलेले व्यवहार आता हळूहळू पूर्वपदावर