पुणे : शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून ते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आज अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की डिसेंबर महिन्यांपासून शिवपुत्र संभाजी राजे या महानाट्याचा प्रयोग सुरू आहे. राज्यातील विविध शहरात याचे प्रयोग होत आहेत. केवळ राजकारणात पडून राहण्यापेक्षा भावी पिढीला छत्रपतींचा इतिहास विवेक बुध्दीने पोहचविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी त्यात गुंतलेलो आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
342 वा राज्यभिषेक सोहळा : छत्रपती संभाजी राजे यांचा आज 342 वा राज्याभिषेक दिवस आहे. यानिमित्ताने पुण्यातील संभाजी राजे पुतळा येथे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास तब्बल ३० फुटी पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना अभिवादन करणारे फलक लावण्यात आले होते.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवणे महत्त्वाचे : खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवणे महत्त्वाचे आहे. छत्रपतींच्या विषयात विनाकारण राजकारण यायला नको, जो खरा इतिहास आहे तो लोकांसमोर यायला हवा. १६८९ मध्ये महाराजांनी तेजस्वी बलिदान स्वीकारले. मात्र गेले अनेक वर्ष हा इतिहास समोर आणू दिला नाही. छत्रपतींचे काम हा खूप मोठे असून या इतिहासाला लोकमान्यता मिळत नव्हती. या इतिहासाला समोर येऊन दिले जात नव्हते पण आता तो इतिहास समोर येत आहे. यामध्ये राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहणे गरजेचे असल्याचे खासदार कोल्हे म्हणाले.
खासदार कोल्हेंचा टोला : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून राज्यभर विविध शहरात महानाट्य सादर केले जात आहे. यावर कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, महानाट्य बघायला या. हे महानाट्य छत्रपती संभाजी महाराजांचे आहे. इतिहास हा बघणाऱ्यांच्या नजरेत असतो, असे म्हणत महानाट्यावर टीका करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टोला यावेळी कोल्हे यांनी लगावला आहे.
राजकारण आणू नका : मराठा साम्राज्याचे तेजस्वी महानायक छत्रपती संभाजी महाराज यांचा सन १६८१ साली राज्याभिषेक झाला होता. आज आपल्याकडून छत्रपतींच्या विचाराचे वारसदार म्हणून महाराजांचा खरा इतिहास जगासमोर मांडणे एवढी एकच माफक अपेक्षा आहे. छत्रपतींच्या विषयांमध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये, असे देखील यावेळी कोल्हे म्हणाले.