पुणे - जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वादरम्यान शहरातील तीन मंदिरे भक्तांसाठी खुले करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यावर गणेशोत्सव काळात राज्यातील अष्टविनायक मंदिर खुली करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांसाठी का होईना, जैन धर्मियांची मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. मागील दोन महिन्यांपासून आम्ही सरकारकडे राज्यातील मंदिर सुरू करण्याची मागणी करत आहोत. परंतु, सरकार आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा कोर्टातच जायला पाहिजे होते, असे आनंद दवे म्हणाले.
सरकार पेक्षा कोर्टाला नागरिकांच्या भावना जास्त कळतात, असे यावरून दिसते. जैन धर्मियांचे मंदिर जशी उघडली तशीच राज्यातील अष्टविनायकाचे मंदिर आणि गणपतीची प्रमुख मंदिरे उघडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असेही आनंद दवे म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिर 22-23 ऑगस्टला उघडण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच मंदिर उघडल्यानंतर सर्वोतोपरी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रंबधकांना सांगितले आहे. तसेच मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्याने राज्य सरकारला फटकारले.