पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारिका, आशा वर्कर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. शहरी भागातून आलेल्या लोकांना होमक्वारंटाइन करून त्यांची तपासणी करत आहेत. यावेळी अनेक रुग्णांशी त्यांचा संपर्क येत असतो.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, खेड पंचायत समितीच्या माध्यमातून पीपीए मेडिकल किट उपलब्ध करून देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारिका आणि आशा वर्कर यांच्यामार्फत शहरी भाग, ग्रामीण भागातील गाववस्तीपर्यंत प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात आली. यामध्ये हे आरोग्य कर्मचारी कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नसतानाही मोठ्या मेहनतीने काम करत होते.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यासाठी खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय जोशी, सभापती अंकुश राक्षे, भगवान भोकरकर तालुका आरोग्य अधिकारी भगवान गाढवे यांनी चाकण येथील दोन कंपन्यांच्या मदतीने आरोग्य किट उपलब्ध केले आहेत. या किटचे वाटप प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना करण्यात आले आहे.
पुढील काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करत असताना मास्क, सॅनीटायझर आणि इतर स्वसंरक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी योग्य पद्धतीने बजवावी, असे आवाहन खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी केले आहे.