पुणे - राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. राज्यासह पुण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून भयावह परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपण्याची हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पूजेसाठी हे कुटुंब एकत्र आले असता सर्वांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
वैशाली जाधव यांचे वडील 15 जानेवारीला वारले, त्यानंतर दोन महिन्यांनी पूजेच्या निमित्ताने हे सर्व कुटुंबीय एकत्र आले आणि त्यानंतरच कुटुंबातील एका पाठोपाठ एक जण पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली. पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला तो त्यांचा धाकटा भाऊ रोहित जाधव, त्या पाठोपाठ एक एक करत सगळ्यांनाच कोरोनाने घेरले. शहरातील परिस्थिती अगदी बिकट असताना पॉझिटिव्ह झालेल्या या सगळ्यांना रुग्णालयात नेण्याची वेळ आली, तेव्हा मात्र जावई अरुण गायकवाड यांना प्रचंड धावपळ करावी लागली. फक्त 15 दिवसांमध्ये जाधव कुटुंबातील या 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अशा प्रकारे झाले मृत्यू
सुरुवातीला वैशाली अरुण गायकवाड (वय 43) यांचा मृत्यू 30 मार्च 2021 रोजी श्लोक हॉस्पिटल, खेड शिवापूर येथे झाला. त्यांनतर रोहित शंकर जाधव
(वय 38) 3 एप्रिल 2021 रोजी बाणेर कोविड केंद्र येथे निधन झाले. मग श्रीमती अलका शंकर जाधव (वय 62) यांचे लगेच दुसऱ्या दिवशी 4 एप्रिल 2021 रोजी
विनोद मेमोरियल रुग्णालय, विश्रांतवाडी येथे मृत्यू झाला. त्यानंतर अतुल शंकर जाधव (वय 40) यांचा 14 एप्रिल 2021 रोजी कोथरूड येथील देवयानी रुग्णालयात मृत्यू झाला.
पुण्यात कोरोनाची भीषण स्थिती
पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.
आता करायचं काय...!
जावई अरुण गायकवाड यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेले सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता तर कुटुंबात उरले फक्त अतुल आणि रोहित यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं आणि गायकवाड कुटूंब. त्यामुळे आता पुढे या सर्वांशिवाय जगायचं कस हा प्रश्न त्यांना सातत्याने सतावतोय. त्यामुळे देव करो आणि अशी वेळ कुणावरही न येवो, असे ते म्हणतायत.