पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक महत्त्वाची देवस्थानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आता आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचाही समावेश झाला आहे. मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच दर्शन बंद करण्याचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत घेण्यात आला. देवस्थानमधील भक्तनिवास, प्रसाद आणि भोजन व्यवस्थाही बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड विकास ढगे-पाटील यांनी दिली.
भाविकांच्या दर्शनासाठी माऊलींचे मंदिर बंद ठेवण्यात येणार असले तरी समाधीचा अभिषेक आणि नित्यपूजा सुरू राहणार आहे. सध्या आळंदीमध्ये लग्नसराई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरातून असंख्य लोक आळंदीमध्ये येऊन लग्न करतात. या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये गर्दी वाढू नये यासाठी देवस्थानच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - CORONA: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची दिल्ली विमानतळाला भेट
येत्या शुक्रवारी भागवत एकादशी असल्याने वारकरी आणि भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येतील. मात्र, यावेळी भागवत एकादशीला भाविकांनी आणि वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये, असे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.