पुणे : दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वारकरी प्रस्थानासाठी मंदिरात दाखल होतात, याची देही याची डोळा हा दिव्य पालखी सोहळा अनुभवत असतात. परंतु, गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून खबरदारी घेऊन प्रमुख दिंडीतील ७५ वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. ११ जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी आळंदी देवस्थानकडून खबरदारी म्हणून काही नियम करण्यात आले आहेत.
१६ ते १७ हजार वारकरी : गेल्या वर्षी प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिरात तब्बल १६ ते १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक्षात मंदिरात ४ हजार ४८० नागरिक थांबतील एवढीच क्षमता आहे. तसा अहवाल मंदिर प्रशासनाकडे आहे. माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यावेळी प्रमुख ४७ दिंड्या मंदिरात असतात. प्रत्येक दिंडीमध्ये ७५ जणांना मंदिरात प्रवेश असणार आहे, अशी माहिती विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे. माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर प्रदक्षिणावेळी प्रमुख दिंड्यातील इतर वारकरी मंदिरात येऊ शकतात, असे देसाई यांनी सांगितले.
कोरोनानंतर पालखी सुरू : आषाढी वारी 11 जून ते 29 जून या काळात होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरुवात आळंदी येथून 12 जूनला होणार आहे. कोरोना काळात पालख्या, सोहळे स्थगित झाले होते. कोरोनानंतर पालखी सुरू झाल्याचे हे दुसरे वर्ष आहे. आषाढी एकादशी 29 जूनला आहे. हा पालखी सोहळा 3 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. 10 जूनपासून तुकाराम महाराजांच्या पालखीची सुरुवात सुरू होणार आहे. भक्तगण अतिशय आनंदात असतात. आषाढी वारीनिमित्त ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा म्हटला की, वारकरी अगदी प्रफुल्लित होतात.
हेही वाचा :
आषाढी वारीची आढावा बैठक संपन्न, वारकऱ्यांकडून टोल वसुली नको; चंद्रकांत पाटलांची मागणी