पुणे Ajit Pawar vs Sharad Pawar : शहरात आज वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट इथं 47 वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सर्वसाधारण सभेच्या आधी नियामक मंडळाची बैठक असते. या बैठकीला सर्व सभासद उपस्थित असतात. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार, अशी चर्चा बुधवारपासून सुरू होती. अजित पवार यांचा तसा दौरा देखील आलेला होता. मात्र अचानक अजित पवार यांनी हा दौरा रद्द केला आहे. त्यामुळं अजित पवारांनी शरद पवारांसोबत स्टेज शेअर करणं पुन्हा एकदा टाळलं अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
अजित पवार बैठकीला जाणार नाहीत : अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यातील मांजरी इथं आज पार पडत आहे. या सभेला व्हीएसआयचे अध्यक्ष या नात्यानं शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून अजित पवार उपस्थित राहणार होते. व्हीएसआय तर्फे तसा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. अजित पवार गटाचे अनेक नेते देखील व्हीएसआयच्या गेटवर अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी हजर होते. मात्र ऐनवेळी अजित पवार येणार नाहीत, असं सांगण्यात आलंय. मात्र या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील उपस्थित झाले आहेत.
बैठकीला शरद पवार उपस्थित : शिवसेनेच्या 16 आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि 16 आमदार पात्र असल्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतल्यानं राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. त्या पद्धतीचा दौरा देखील आला होता. मात्र आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं नियमक मंडळाच्या बैठकीला शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे उपस्थित झाले असून या बैठकीला अजित पवार यांनी येण्याचं टाळलं आहे.
हेही वाचा :