पुणे : राज्यात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यावरून मत मतांतरे दिसून येत आहेत. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, माझे वैयक्तिक मत आहे की, महाविकास आघाडी टिकली पाहिजे हे महत्त्वाचे आहे. आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला राज्यात मानणारा मोठा वर्ग आहे. ते एकत्र आले तर येणाऱ्या निवडणुकीत वेगळा निकाल पाहायला मिळेल, असे यावेळी पवार म्हणाले. पुण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.
मी स्पष्ठपणे बोलतो : ते पुढे म्हणाले की, मी माझे विचार कुठेही बोलत असताना मी स्पष्टपणे बोलत असतो. मला जे बोलायचे असते ते मी स्पष्टपणे बोलत असतो. आणि जे बोलायचे नसत ते मी बोलत नाही. मला तर आज माहीत देखील नव्हते की, आज माझी मुलाखत आहे. काही लोकांचे असे असते की सुरुवातीला आम्हाला प्रश्न पाठवा आणि मगच आम्ही मुलाखत देणार. पण माझे तसे काही नाही. माझे ठरवून काही नाही जे आहे ते स्पष्ठ आहे, असे यावेळी पवार म्हणाले.
सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे : वंचित बहुजन आघाडीबाबत पवार म्हणाले की, आम्हाला याबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. आमच्या मनात जसे सकारात्मक भूमिका घेऊन जायचे पुढे आहे. तसे समोरच्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जे काही बोलायचे आहे ते चार भिंतीच्या आत बोलले पाहिजे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
शिवसेनेच्या बंडावर काय म्हणाले? : शिवसेनेत झालेल्या बंडावर अजित पवार म्हणाले की, माझ्या दोन ते तीन वेळा कानावर आले होते आणि मी ते उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची देखील चर्चा झाली होती. ते त्यांच्या परीने काम करत होते. दुर्दैवाने त्यात त्यांना यश आले नाही. तसेच त्यांना असे देखील वाटले नाही की एकनाथ शिंदे अशी टोकाची भूमिका घेतील, असे यावेळी पवार म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका : नागपूरच्या जागेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर पवार म्हणाले की, अशा पद्धतीने जेव्हा निकाल लागतात तेव्हा अपयश आले तर दिलदारपने ते स्वीकारले पाहिजे. परंतु असे कारण देणे की ही जागाच आमची नव्हती हे काय बरोबर नाही. जर जागाच नव्हती तर मग केंद्रीय मंत्र्यांनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सभा कशा घेतल्या. तुमचे सगळे कार्यकर्ते कामाला कसे होते. त्यांनी दिलदारपणे मान्य केले पाहिजे की, आम्ही चिंतन करू आणि कुठे चुकले आहे ते शोधून पुढे जाऊ, असा टोला यावेळी पवार यांनी बावनकुळे यांना लगावला आहे.
सत्यजीत तांबेंच्या विजयावर प्रतिक्रिया : सत्यजीत तांबेंच्या विजयावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील काहींनी सत्यजीतला मदत केली. त्या मतदारसंघात त्याला एवढी मते मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढे दैदिप्यमान यश मिळाले आहे. त्याचे घराणे काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे मधल्या दीड महिन्यात काय झाले हे त्याने जास्त मनाला लावून घेऊ नये, असे अजित पवार म्हणाले.
विचार करून निर्णय घ्यावा : अजित पवार पुढे म्हणाले की, इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार आहे. सत्यजीतला पुढे त्याचे राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचे आहे. या सगळ्याचा विचार करून त्याने निर्णय घ्यावा, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
नौटंकी करण्याचा प्रयत्न : एमपीएससीच्या आंदोलनाबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, काही जण नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे. पर्वा जे आंदोलन झाले ते तर ठरवून झालेले होते. काही जण बरोबर जातात त्याठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होते आणि मग लगेच निर्णय देखील घेतल जातात. हे सगळ सेट केलेले होते, असे देखील यावेळी पवार म्हणाले.