बारामती - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून लहान मुलांसाठी सुसज्ज स्वतंत्र कोविड वार्ड सुरू करावे तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, बारामती तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्ड सर्व सुविधेसह सुरू करावे. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे.
'ऑक्सिजन निर्मिती संच उभारण्यावर भर द्या'
मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे चालू आहेत. शेती संबंधित कामे निर्बंधाच्या कालावधीत अडता कामा नये याची दक्षता घ्यावी. प्रत्येक रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती संच उभारण्यावर भर द्यावा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ऑक्सिजन निर्मिती संच नामवंत कंपन्याचे असणे आवश्यक आहे. रुग्णालयातील व्हेंटीलेटर दुरुस्त करुन घ्यावेत. म्यूकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्सशनचे योग्य नियोजन करावे, त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, बारामती तालुक्यात बेड उपलब्ध असल्यास गृहविलगीकरण बंद करण्यात यावेत. तसेच शक्य असल्यास पेशंटच्या इच्छेनुसार खासगी रुग्णालयात विलगीकरण करण्यात यावे. महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय, बारामती येथे कॅन्टीन सुरू करण्यात यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.